बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली. “आज जर राजीव गांधी असते तर सर्वाधिक आनंद त्यांना झाला असता,” असं कमलनाथ यावेळी म्हणाले.

कमलनाथ यांनी राम मंदिराच्या निर्मितीबद्दल आनंद व्यक्त केला. “प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. आपल्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आज जर माजी पंतप्रधान राजीव गांधी असते तर सर्वाधिक आनंद त्यांनाच झाला असता,” असं कमलनाथ यावेळी म्हणाले. राम मंदिराच्या निर्मितीचं आम्ही स्वागत करतो. १९८५ मध्ये राजीव गांधी यांनी याची सुरूवात केली होती. १९८९ मध्ये त्यांनी मंदिराची पायाभरणी केली होती. त्यांच्यामुळेच आज राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आम्ही मंदिराच्या निर्मितीसाठी मध्यप्रदेशच्या जनतेकडून चांदीच्या ११ वीटा पाठवणार असल्याचंही कमलनाथ म्हणाले.

“हा भारत संस्कृती जोडणारा आहे. या ठिकाणी निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात. हीच आपली ओळख आहे. आम्ही जे काही करतो त्यानं भाजपाला पोटदुखी का होते हे माहित नाही. धर्म ताय त्यांचं पेटंट आहे का? त्यांनी धर्माची एजन्सी घेतली आहे का?,” असा सवालही त्यांनी केला. “आम्ही छिंदवाड्यात हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे. आमच्या सरकारनं गौशाळांची उभारल्या, महाकाल आणि ओंकारेश्वर मंदिराच्या विकासासाठीही योजना तयार केली,” असंही ते म्हणाले.