रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भाऊ सुरक्षित रहावा अशी इच्छा व्यक्त करत त्याच्या हातावर राखी बांधते. गुरुवारी रक्षाबंधनचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधण्यासाठी एका खास व्यक्ती दिल्लीत दाखल झाली आहे. ही खास व्यक्ती म्हणजे अहमदाबादच्या कमर जहाँ. मागील २४ वर्षांपासून कमर या मोदींना न चुकता राखी बांधतात. विशेष म्हणजे कमर या मुळच्या पाकिस्तानमधील कराचीच्या असून मागील अनेक वर्षांपासून त्या अहमदाबादमध्ये राहतात.

मोदींबरोबर कमर यांचे खास नाते आहे. ‘सध्या पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी हे “सामान्य कार्यकर्ता असल्यापासून मी त्यांना राखी बांधतेय’, असं कमर सांगतात. लोकांसाठी काम करायचे आहे याच उद्देशाने मोदींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची मेहनत, इमानदारी आणि मनापासून काम केल्यानेच मजल दरमजल करत आज ते भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. एक पंतप्रधान माझा भाऊ आहे याहून अधिक आनंदाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. इतक्या प्रतिभावान पंतप्रधानांची बहीण असल्याचा मला गर्व आहे,” असं कमर सांगतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मानलेली बहीण असणाऱ्या कमर यांनी आपण नेहमीच पंतप्रधानांसाठी देवाकडे प्रार्थना करतो असं सांगितलं. “मोदी मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवाकडे प्रार्थना करायचे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करायचे. आता ते पंतप्रधान झाले आहेत तर मी त्यांना नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहे. प्रत्येक वेळेस माझ्या भावाला यश मिळोच अशीच इच्छा मी देवाकडे व्यक्त केली,” असं कमर सांगतात.

भारतात आल्या अन्…

कमर यांनी त्या भारतात कशा आल्या याबद्दलही माहिती दिली. त्या म्हणतात ‘मी माझ्या आईबरोबर भारतामधील काही नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेले. इथे आल्यानंतर मी भारतामध्येच राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या नशिबामध्ये भारतात रहाणेच होते. मी पाकिस्तानमध्ये नसून भारतात असल्याने स्वत:ला खूप नशिबवान समजते. मला इथे कोणत्याही गोष्टीची कमतरता जणावली नाही. इश्वराच्या कृपेने मला इथे भाऊ-बहिणींचे प्रेमही मिळाले,’ अशा भावना कमर यांनी ‘न्यूज १८ हिंदी’शी बोलताना व्यक्त केल्या.

आधी राखी मग भाषण

यंदा स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आहे. “यंदा मी १५ ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधान मोदींना राखी बांधणार आणि नंतर लाल किल्ल्यावरुन त्यांचे भाषण ऐकणार. याचा दुप्पट आनंद आहे,” असं कमर म्हणतात.

खास भेटवस्तू

पंतप्रधान मोदींसाठी कमर यांनी खास भेटवस्तूही घेतली आहे. मात्र ही भेटवस्तू काय आहे हे सांगण्यास कमर यांनी नकार दिला असून राखी बांधल्यानंतर ती भेटवस्तू मोदींना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी देशाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. रक्षाबंधनच्या आधीच तिहेरी तलाकविरोधी कायदा करुन मुस्लीम बहिणींना मोदींनी मोठी भेट दिली आहे. तर दुसरीकडे अनुच्छेद ३७० आणि ३५ अ रद्द करत त्यांनी काश्मीरमधील जनतेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भेट म्हणून दिले आहे. अनुच्छेद ३७० आणि ३५ अ रद्द केल्याचा फायदा येणाऱ्या काळात समोर येईल असा विश्वास कमर यांनी व्यक्त केला आहे.