जगातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. मात्र नेपाळमधील एका वाटसरुने चक्क २४ वेळा हे शिखर सर करण्याचा आगळावेगळा पराक्रम मंगळवारी केला आहे. कामी रिता शेर्पा यांनी मागील आठवड्यात २३ व्यांदा एव्हरेस्ट सर केल्यानंतर मंगळवारी (२१ मे २०१९) पुन्हा एकदा हे शिखर सर केले. असा पराक्रम करणारे ते एकमेव व्यक्ती आहेत.

यासंदर्भात एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना रिता यांचे सहकारी मिंगमा शेर्पा यांनी माहिती दिली. ‘मंगळवारी सकाळी रिता यांनी भारतीय पोलीस दलातील गिर्यारोहकांबरोबर एव्हरेस्ट सर करत अनोखा विक्रम केला. आम्हाला रिता यांचा अभिमान वाटतो,’ असं मत मिंगमा यांनी व्यक्त केले. मागील दोन दशकांहून अधिक काळापासून एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांना वाट दाखवण्याचे काम करणाऱ्या रिता यांनी सर्वात आधी १९९४ साली एव्हरेस्टचे ८ हजार ८४८ मीटर उंचीचे शिखर सर केले होते. त्यानंतर मागील २५ वर्षांमध्ये रिता यांनी ३५ हून अधिक वेळा ८ हजार मीटरहून अधिक उंचीची शिखरे सर केली आहेत. ४९ वर्षाच्या रिता यांनी यशस्वीरित्या सर केलेल्या शिखरांच्या यादीमध्ये पाकिस्तानमधील के टू या शिखराचाही समावेश आहे. के टू हे जगातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे.

मागील वर्षीच रिता यांनी २२ व्यांदा एव्हरेस्ट सर करत २१ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम मोडीत काढला होता. रिता यांच्याआधी हा विक्रम दोन शेर्पांच्या नावे होता. मागील आठवड्यातच २३ व्यांदा शिखर सर करुन आल्यानंतर रिता यांचे बेस कॅम्पवर जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यावेळीच त्यांनी या हंगामात पुन्हा एकदा एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘मी खूप आनंदी असून मला या कामगिरीचा अभिमान आहे. याच हंगामात परत एकदा मी एव्हरेस्टवर जाईन,’ असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. रिता यांनी कधीच विक्रम करण्याची चढाई केली नाही मात्र इतक्या वर्ष वाटाड्या म्हणून काम करताना त्यांनी हा विक्रम आपल्या नावे केला आहे असं मत स्थानिक वाटाड्यांनी व्यक्त केले आहे. ‘एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम आहे हे मला ठाऊक नव्हते. मी केवळ गिर्यारोहकांना वाट दाखण्याचे माझे काम करतो. मी विक्रमांसाठी चढाई करत नाही,’ असंही रिता यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

कामी रिता शेर्पा

नेपाळमधील शेर्पा लोक हे येथील गिर्यारोहणावर आधारित पर्यटनाचा आधारस्तंभ आहेत. कमी ऑक्सिजन असतानाही काम करण्याची क्षमता, उंच प्रदेशात राहण्याची सवय, गिर्यारोहकांचे साहित्य वाहून नेण्याची ताकद या गुणवैशिष्ट्यांमध्ये अनेक शेर्पांना रोजगार मिळाला आहे. आपल्या रोजगाराचा भाग म्हणून हे शेर्पा गिर्यारोहकांबरोबर एव्हरेस्ट शिखर सर करतात. १९५३ साली तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या दोघांनी एव्हरेस्ट हिमशिखरावर पाऊल ठेवले. त्यानंतर येथे एव्हरेस्ट सर करण्याचा उद्योगच सुरु झाला. अगदी सरकारकडून देण्यात येणाऱ्या परवाण्यांपासून ते गिर्यारोहकांच्या राहण्या-खाण्याची सोय अशा अनेक माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यात एव्हरेस्टबद्दल गिर्यारोहकांना असणाऱ्या आकर्षणाचा मोठा वाटा आहे.