21 April 2019

News Flash

अय्यपा दर्शनानंतर सासरी प्रवेश नाकारल्याने कनकदुर्गा निवारागृहात

तिचा पती व इतर नातेवाईक हे तिथून निघून गेले असून दुसऱ्या इमारतीत राहात आहेत.

केरळातील शबरीमला येथे अय्यपा मंदिरात दर्शन घेणाऱ्या कनकदुर्गा या महिलेस एका केंद्रात आश्रय घेण्याची वेळ आली

शबरीमला प्रवेशानंतर कुटुंब दुरावले; घराला कुलूप, नातेवाईकांकडूनही विरोध

पेरीनथालमना, केरळ : केरळातील शबरीमला येथे अय्यपा मंदिरात दर्शन घेणाऱ्या कनकदुर्गा या महिलेस एका केंद्रात आश्रय घेण्याची वेळ आली असून, तिने अय्यपाचे दर्शन घेतल्याने नातेवाइकांनी तिला घरात प्रवेश नाकारला आहे. तिचे कुटुंबीय दुसऱ्या इमारतीत राहायला गेले असून, ती आधीच्या घरी गेली असता तिला कुलूप लावलेले दिसले असे पोलिसांनी सांगितले.

कनकदुर्गा (वय ४४) हिने घरगुती हिंसाचार कायद्यानुसार न्यायालयात याचिका दाखल केली असून, पतीच्या घरात राहण्याचा अधिकार असल्याचे तिने म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कनकदुर्गा ही तिला कोझोकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर पतीच्या घरी गेली असता घराला कुलूप असल्याचे तिला दिसून आले.

याआधी तिच्या सासूने तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. तिचा पती व इतर नातेवाईक हे तिथून निघून गेले असून दुसऱ्या इमारतीत राहात आहेत. त्यानंतर कनकदुर्गा हिने एका केंद्रात आश्रय घेतला आहे. कनकदुर्गा ही नागरी पुरवठा विभागात कर्मचारी असून, तिने महाविद्यालयीन प्राध्यापक व माकप कार्यकर्ती बिंदू हिच्यासह २ जानेवारीला अय्यपा मंदिरात प्रवेश केला होता. या दोघी १०-५० वयोगटांतील आहेत. या गटातील महिलांना मंदिरात प्रवेशबंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मात्र पाळीच्या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा असे म्हटले होते. महिला व बालकल्याण मंत्रालयाने महिलांसाठी निवारागृहे तयार केली असून, तेथे कनकदुर्गा हिने आश्रय घेतला असून, तेथे दहा पोलीस ठेवण्यात आले आहेत. पेरीनथालमनाचे पोलीस निरीक्षक टी. एस. बिनी यांनी सांगितले, की कनकदुर्गा हिला तेथे सुरक्षा देण्यात आली असून, सीसीटीव्ही निगराणी ठेवण्यात आली आहे.

First Published on January 24, 2019 3:06 am

Web Title: kanaka durga stay at government shelter home after barred from home