कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (बुधवार) निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गेल्या महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.

जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ मध्ये झाला होता. ते कांचीपूरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. कांचीपूरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन यांच्या हत्या प्रकरणात जयेंद्र सरस्वती आरोपी होते. मात्र न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली होती.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. लाखो भक्तांच्या ह्दयात शंकराचार्य सदैव राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो , अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.