गुजरात किनारपट्टीनजीक बुधवारी मर्चंट नेव्हीच्या एका तेलवाहक जहाजाला आग लागली. या जहाजात तब्बल ३० हजार टन हाय-स्पीड डिझेल असल्याचे सांगण्यात येते. समुद्रात तेल पसरले आहे किंवा नाही याबाबत अजून समजू शकले नसल्याचे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. एमटी गणेश हे तेलवाहक जहाज गुजरातच्या कांडलातील दिनदयाल बंदरापासून १५ नॉटिकल मैल लांब आहे. दरम्यान, ‘एएनआय’च्या वृत्तानुसार या जहाजाच्या परिसरातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये मात्र तेल आढळून आलेले नाही.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास या जहाजाला आग लागली. भारतीय तटरक्षक दलाने तत्परता दाखवत जहाजाच्या चालकासह सर्व २६ क्रू मेंबर्सना वाचवले. यामध्ये दोघे जण जखमी आहेत.

चालकाच्या केबिनमध्ये आग लागली आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय तटरक्षक दलाची इंटरसेप्टर बोट सी-४०३ घटनास्थळी पोहोचली त्याचबरोबर समुद्री सुरक्षा संस्थेची प्रदूषण नियंत्रण टीमही सक्रिय झाली आहे. आगीची स्थिती समजण्यासाठी डोर्नियर विमान तैनात करण्यात आले आहेत.