अभिनेत्री कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी राजकारणात येण्याचा विचार केल्यास भाजपाकडून त्यांना ऑफर असल्याचं हिमाचल प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप म्हणाले. कंगनाला Y+ सुरक्षा पुरवल्याप्रकरणी आशा यांनी भाजपाचे आभार मानल्यानंतर सुरेश कश्यप यांनी हे वक्तव्य केलं. कंगनाची आई आशा या आपल्या मुलीसोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली.

मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. याबाबत बोलताना “ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. महाराष्ट्र सरकारने माझ्या मुलीसोबत चुकीचं केलं. शिवसेना माझ्या मुलीवर अन्याय करत आहे. संपूर्ण भारतातील जनता हे अजिबात खपवून घेणार नाही”, असं आशा रणौत म्हणाल्या.

कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली होती. ‘राजकीय द्वेषासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकारने हिमाचलची लेक कंगना रणौतसोबत जो अत्याचार केला, त्याचा मी तीव्र निषेध करतो. हिमाचल आणि संपूर्ण देश कंगनाच्या सोबत आहे’, असं ते म्हणाले होते.