बॉलिवूड अभिनेत्री कंगनाला वाय प्लस सुरक्षा दिल्यामुळे कंगनाच्या आईने मोदी सरकार आणि हिमाचल सरकाचे आभार व्यक्त केले. आमचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतो. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगानाची आई आशा राणौत यांनी केलं आहे.

कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊन आणि हिमाचल प्रदेशच्या जयराम ठाकूर सरकारनेही सुरक्षा पुरविल्यामुळे आम्ही भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगनाची आई आशा राणौत यांनी केले आहे. कंगनाच्या हिमाचल प्रदेशमधील मूळ घरी भाजपा कार्यकर्ते अन् स्थानिक नेते गेले होते. तेव्हा आशा राणौत यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी आशा राणौत यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे अश्वासन दिलं. घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नसल्याचेही वक्तव्य स्थानिक भाजपा नेत्यांनी केलं आहे.

कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते. मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळा देश माझ्या मुलीसोबत म्हणजेच कंगनासोबत उभा राहिला. लोकांचे आशीर्वाद तिच्या पाठिशी आहेत. मला कंगनाचा अभिमान वाटतो. कंगनाने कायमच सत्याची कास धरली आहे. एवढंच नाही ती यापुढेही तिच्या सत्यावर ठाम राहिल याची मला खात्री आहे” असंही आशा रणौत यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने आपल्याला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर तिच्यावर राजकीय आणि सिनेक्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. खासकरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं होतं. ज्यानंतर मी ९ तारखेला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हान कंगनाने दिलं होतं. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. वाय दर्जाची सुरक्षा पुरवल्याबद्दल कंगनानेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले होते. आता कंगनाची आई आशा रणौत यांनीही अमित शाह यांचे आभार मानले आहेत.