शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कंगना रणौतचा उल्लेख ‘हरामखोर मुलगी’ असा केला. त्यांच्या या टिप्पणीवर आता कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्यासारख्या लोकांची मानसिकता देशातील महिलांच्या शोषणासाठी जबाबदार असल्याचं कंगनाने म्हटलंय. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने संजय राऊतांना खुलं आव्हान दिलं आहे.

काय म्हणाली कंगना?

“मी हरामखोर मुलगी आहे असं तुम्ही म्हणालात. तुम्ही सर सरकारी यंत्रणेत काम करता, तुम्हाला हे माहितच असेल की या देशात प्रत्येक दिवशी तर प्रत्येक तासाला किती महिलांचे बलात्कार होतात, किती महिलांचं शोषण केलं जातंय. कामाच्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, पतींकडून पत्नींचं शोषण होतं. या सर्व गोष्टींना तुमच्यासारखी मानसिकता जबाबदार आहे. या देशाच्या मुली तुम्हाला माफ करणार नाहीत. महिलांचं शोषण करणाऱ्यांचं सक्षमीकरण करण्याचं काम तुम्ही केलंय.

जेव्हा आमिर खान, नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलं की या देशात आम्हाला सुरक्षित वाटत नाही, तेव्हा त्यांना कोणी हरामखोर म्हटलं नाही. ज्या मुंबई पोलिसांचं मी आधी कौतुक करायचे, पण पालघर मॉब लिंचिंगसारखे प्रकरण घडल्यामुळे, सुशांतच्या हताश वडिलांची एफआयआर नोंदवून घ्यायला मागेपुढे केल्यामुळे मी त्यांची निंदा करते. हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संजय राऊतजी, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात. मी महाराष्ट्राची निंदा केली असं तुम्ही म्हणू शकत नाही. या देशाच्या अस्मितेसाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलंय, मीसुद्धा द्यायला तयार आहे. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. भेटुयात.”

संजय राऊतांच्या ‘हरामखोर’ या टिप्पणीवर बॉलिवूडमधल्या कलाकारांनीही आक्षेप नोंदवला. राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री दिया मिर्झाने केली. तर दुसरीकडे कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन असं उत्तर संजय राऊतांनी दिलं. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळतेय.