मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. हिमाचल प्रदेशातून बुधवारी ती मुंबईत दाखल होताच प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाने सारे विषय बाजूला सारत कंगनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर घरावरील कारवाईवरून कंगनाने दिवसभर ट्विटरवरून थयथयाट केला. अनेक वृत्तवाहिन्यांनी मुंबई महापालिकेने कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी वेळ का दिला नाही असा प्रश्न उपस्थित केला. यावरुनच काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे. सध्या खेडा यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रसारमाध्यमांकडून मुंबई महापालिकेच्या कारवाईसंदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवरुन खेडा यांनी थेट मोदी सरकारच्या लॉकडाउनच्या निर्णयाच्या वेळी भारतीयांना सरकारने आणखीन वेळ का दिला नाही असा प्रश्न वृत्तवाहिन्यांना विचारला आहे. “मुंबई महानगरपालिकेने कंगना रणोतला तिच्या कार्यालयामधील अनियमित बांधकाम हटवण्यासाठी वेळ का नाही दिला? असा प्रश्न आता काही वृत्तवाहिन्या विचारत आहेत. या त्याच वृत्तवाहिन्या आहेत ज्यांनी लॉकडाउन करण्याआधी करोडो भारतीयांना वेळ का नाही दिला असा प्रश्न पंतप्रधानांना एकदाही विचारलेला नाही,” अशा शब्दांमध्ये खेडा यांनी वृत्तवाहिन्यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी वापर करत कंगनाने ‘फिल्म माफियांसोबत हातमिळवणी करत तुम्ही माझे घर तोडले असून तुमचेही गर्वहरण होईल, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ  नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.

पालिकेच्या नोटीशीत काय उल्लेख?

कंगनाच्या घरात १४ अनधिकृत बांधकामे केल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. काही ठिकाणी अनधिकृतपणे खोल्या उभारण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले होते. मात्र मुंबई महापालिकेने कालपर्यंत कोणतीही नोटीस पाठवली नाही. नूतनीकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे तिने सांगितले.