जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याच्यावर गुरुवारी विद्यापीठाच्या संकुलातच बाहेरच्या एका युवकाने हल्ला करण्याची घटना घडली आहे.
विद्यापीठाच्या संकुलातील प्रशासकीय इमारतीमध्ये राष्ट्रभक्तीवर व्याख्यान सुरू होते. ते ऐकण्यासाठी कन्हैयाकुमार बसलेला असताना हल्लेखोर युवकाने कन्हैयाला चर्चा करण्यासाठी बाहेर येण्यास सांगितले, असे तेथे हजर असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी सांगितले.
त्यानंतर त्या युवकाशी चर्चा करण्यासाठी कन्हैया एका कोपऱ्यात गेला तेव्हा त्या युवकाने कन्हैयाला शिवीगाळ केली, त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली असता त्या युवकाने कन्हैयाकुमारच्या श्रीमुखात भडकावली.
हा प्रकार पाहताच अनेक विद्यार्थी आणि विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक कन्हैयाकुमारच्या बचावासाठी धावले. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोर युवकाला पकडून नजीकच्या पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्या युवकाची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर युवकाची ओळख अद्याप पटलेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याबद्दल कन्हैयाकुमारवरील कारवाई उघडकीस
विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिला धमकावल्याप्रकरणी कन्हैयाकुमार याच्यावर प्रशासनाने गेल्या वर्षी दंडात्मक कारवाई केली होती, असे आता उघडकीस आले आहे.विद्यापीठाच्या संकुलात उघडय़ावर लघुशंका करू नये, असे सदर विद्यार्थिनीने कन्हैयाला सांगितले होते. त्यावेळी म्हणजेच १० जून २०१५ रोजी कन्हैया हा विद्यार्थी संघटनेचा नेता नव्हता. सदर विद्यार्थिनी सध्या दिल्ली विद्यापीठात शिक्षिका आहे. कन्हैयाने आपल्याशी गैरवर्तन केले आणि आपल्याला धमकी दिली होती असा आरोपी तिने केला आहे. विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरून जेएनयू प्रशासनाने चौकशी केली असता कन्हैया दोषी असल्याचे आढळले. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे असे नमूद करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र कन्हैयाच्या कारकिर्दीचा विचार करून कुलगुरूंनी सौम्य भूमिका घेतली होती.