सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे कन्हैया कुमार लवकरच काँग्रेससोबत आपली नवीन राजकीय खेळी सुरू करण्याची शक्यता आहे. कन्हैया कधी आणि कोणत्या पदासोबत पक्षात सामील होईल याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानीही काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसने मेवानीला उमेदवारी न देता मागच्या विधानसभा निवडणुकीत मदत केली होती.

इंडियल एक्सप्रेसच्या वृत्तांनुसार, कन्हैया कुमारच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्याला सीपीआयमध्ये गुदमरल्यासारखे वाटत होते. कन्हैयाने मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि दोघांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे समजते.” कुमारच्या पक्षातून बाहेर पडण्याबद्दल विचारले असता, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा म्हणाले की त्यांनी या संदर्भात फक्त ऐकले आहे. “मी एवढेच सांगू शकतो की या महिन्याच्या सुरुवातीला ते आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होता. त्याने भाषण केलं  आणि चर्चेत भाग घेतला,” असे राजा म्हणाले.

बिहारमध्ये काँग्रेसला सावरण्याची संधी

अनेक काँग्रेस नेत्यांचा असा विश्वास आहे की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळू शकते. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास कमाल करु शकलेली नाही. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआय (एमएल) च्या तुलनेत काँग्रेसने वाईट कामगिरी केली. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागा जिंकल्या. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआय (एमएल) ने १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते.

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाला विश्वास आहे की कुमार आणि मेवाणी यांच्या प्रवेशामुळे नव्या दृष्टीने पक्षाला चालना मिळेल. कारण गेल्या दोन वर्षांपासून पक्षाला तरुण नेत्यांची गरज होती. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्ष सोडल्यानंतर ती गरज अधिक भासू  लागली आहे.

अशा स्थितीत कन्हैयाकडून पक्षाला काय फायदा होणार, असाही प्रश्न पक्षांतर्गत वेगाने वाढू लागला आहे. कन्हैयाचा सीपीआय नेतृत्वावर राग आहे. अशा परिस्थितीत जर त्याला काँग्रेसचे व्यासपीठ मिळाले तर त्यांचा राजकीय वजन वाढेल. पण पक्षाला काय फायदा होईल, काँग्रेस या नफा -तोट्याचे आकलन करण्यात व्यस्त आहे.

कन्हैयामध्ये तरुण नेतृत्व पाहत आहे काँग्रेस

काँग्रेसला कन्हैयामधील एका तरुण नेत्याची प्रतिमा दिसत आहे, जो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करतो आणि पूर्ण निर्दोषतेने आपले म्हणणे मांडतो. नेतृत्वाच्या संकटाचा सामना करणारी काँग्रेस कन्हैयाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते. पण डाव किती प्रभावी ठरेल हे वेळच ठरवेल.