मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असल्याच्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमारने समाचार घेतला आहे. १५ लाख विसरा या सरकारच्या काळात आपल्या खिशातील पैसे वाचवणेही कठीण आहे. आठवले यांचे वक्तव्य म्हणजे डिसेंबरमध्ये ‘एप्रिल फुल’ करण्यासारखे आहे, असा टोला त्याने लगावला आहे.

सोमवारी (दि.१७) सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी मोदी सरकार प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असल्याचे म्हटले होते. एवढी मोठी रक्कम सरकारकडे नाहीये, त्यासाठी आरबीआयकडे पैसेही मागितले पण त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे हे पैसे एकत्र टाकले जाणार नाहीत. टप्प्याटप्प्याने हे पैसे टाकले जातील. रिझर्व्ह बँकेशी याबाबतची बोलणी सुरु असून लवकरच पैसे जमा होतील असे आश्वासन आठवले यांनी दिले होते.

त्यावर कन्हैय्याकुमार म्हणाला की, विदेशातून काळा पैसा आणून १५ लाख देणार असल्याचे म्हटले होते. आता त्यांची आरबीआयच्या राखीव निधीवर नजर पडली आहे. १५ लाख विसरा, यांच्या शासन काळात आता आपल्या खिशातील पैसाही वाचवणे कठीण झाले आहे, असे ट्विट त्याने केले आहे. हा डिसेंबरमध्ये एप्रिल फुल बनवण्याचा प्रकार असल्याचेही तो म्हणाला.