केरळच्या कन्नूर जिल्ह्य़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची त्याच्या आईवडिलांच्या पुढय़ातच बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराने खळबळ माजली आहे. या प्रकारावरून आता भाजप आणि माकप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

संघपरिवाराच्या या कार्यकर्त्यांचे नाव सुजित (२७) असे असून सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकारावरून भाजपने माकपवर टीका केली असली तरी माकपने त्याचे खंडन केले आहे. एका मुलीची छेड काढण्यावरून निर्माण झालेल्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे माकपचे म्हणणे आहे.

या हत्येप्रकरणी माकपच्या १० समर्थकांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर सुजितला रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तो मरण पावला.

हल्लेखोर सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुजितच्या घरात घुसले. या वेळी हल्लेखोरांना आवरण्याच्या प्रयत्नात सुजितचा भाऊ आणि वृद्ध आईवडील यांनाही दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे माकपचा हात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा अध्यक्ष सत्यप्रकाश यांनी केला आहे.

भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माकपचा नेता पी. जयराजन याला अटक करण्यात आल्याने माकप हिंसाचार घडवीत आहे, असे सत्यप्रकाश म्हणाले. या हत्येच्या निषेधार्थ कन्नूरमध्ये भाजपने हरताळ पाळला आहे. मात्र हल्ला राजकीय कारणावरून करण्यात आलेला नाही, तर स्थानिक पातळीवरील वैमनस्यातून करण्यात आल्याचे माकपने म्हटले आहे.