कानपूरमधील जाजमऊ येथे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून सुमारे ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३० ते ४० लोक दबले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इमारत कोसळताच लगेचच मदतकार्यास सुरूवात झाली. लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरूवात केली. ढिगाऱ्याखाली अनेक महिला व मुलांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याचे बोलले जाते. आतापर्यंत १२ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ही इमारत कोसळल्यामुळे आजुबाजूच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. अरूंद रस्ता असल्यामुळे लष्कराची मदत करणारी वाहने घटनास्थळी पोहोचण्यास मोठी अडचण आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण टीमलाही मदतीसाठी येथे बोलावण्यात आले आहे.

तपासासाठी तज्ज्ञांचा चमू पाठवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौशल राज यांनी माध्यमांना सांगितले. तसेच मदत कार्यही सुरू असल्याचे ते म्हणाले.