कानपूर चकमक प्रकरणातील आरोपी विकास दुबे या घटनेपासून बेपत्ता आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडून विकास दुबेचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे चकमकीची चौकशीही केली जात आहे. या चकमकीची विकास दुबेला आधीच माहिती मिळाली होती, असं चौकशीतून समोर आल्यानंतर चौबेपूर पोलीस ठाण्यातील पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आहे. चौबेपूर पोलीस ठाण्यासह बिल्होर, ककवन आणि शिवराजपूर अशा चार पोलीस ठाण्यातील २०० पोलिसांकडून विकास दुबेला मदत केल्याचा संशय आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची या अंगानंही चौकशी केली जाणार आहे.

विकास दुबे आणि कानपूर चकमक प्रकरणात २०० पोलिसांवर माहिती दिल्याचा संशय असल्याचं वृत्त ‘आजतक’नं दिलं आहे. विकास दुबे प्रकरणात पोलीस विभागच संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी यापूर्वीच चौबैपूर पोलीस ठाण्याची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर चौकशीतून असं समोर येऊ लागलं आहे की, विकास दुबेला मदत करणाऱ्या पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

विकास दुबेसोबत संबंध असल्याचा चौबैपूर पोलीस ठाण्यासह २०० पोलीस कर्मचाऱ्यांवर संशय आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विकास दुबेला मदत केली. तसेच त्याच्याकडून लाभ करून घेतल्याचा संशय आहे. चौबैपूर, बिल्होर, ककवन आणि शिवराजपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. यातील काही पोलीस अधूनमधून चौबेपूर पोलीस ठाण्यात ड्यूटीला असायचे, असं आजतकनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

कानपूर चकमक प्रकरणाची विशेष टास्क फोर्स चौकशी करत असून, संशयास्पद भूमिका असलेल्या पोलिसांचे फोन कॉलही तपासले जाणार आहेत. यातील अनेक पोलीस कर्मचारी हे विकास दुबेला मदत करायचे, अशी माहिती समोर आली आहे.

बिकरूत कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला दिली होती धमकी

कानपूर चकमकीनंतर बिकरू येथे कार्यरत असणाऱ्या के.के. शर्मा यांना निलंबित करण्यात आलं. चौकशीत शर्मा यांनी पोलिसांना सांगितलं होतं की, “२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता विकास दुबेनं आपल्याला धमकी दिली होती. ठाणे प्रमुखाला समजावून सांग, गोष्ट वाढली तर गावातून मृतदेहच बाहेर पडेल. त्यामुळे दुसरीकडे ड्यूटी देण्याची मागणी केली होती. तसेच चकमकीच्या दिवशी त्या पथकात सहभागी झालो नव्हतो,” अशी माहिती शर्मा यांनी दिली होती.