विकास दुबेने अनेक घरं बर्बाद केली आहेत. तो जर माझ्यासमोर आला असता तर मीच त्याला गोळी मारली असती अशी प्रतिक्रिया विकास दुबेची पत्नी ऋचा दुबेने दिली आहे.विकास दुबे मला टॉर्चरही करत असे. माझा विकासने केलेल्या गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही. मी त्याच्या मुलांना सांभाळते आहे. मात्र ते विकाससारखे घडावेत असं मला मुळीच वाटत नाही असंही ऋचाने म्हटलं आहे. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना ऋचा दुबेने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यामध्ये तिने ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विकास दुबेच्या एन्काऊंटर बाबत तिला विचारलं असता जे काही झालं ते योग्य झालं अशीही प्रतिक्रिया तिने दिली आहे.
विकास दुबेकडे कोट्यवधींची संपत्ती आहे का? असा प्रश्न जेव्हा ऋचाला विचारला गेला तेव्हा ती म्हणाली की विकासची कोट्यवधींची संपत्ती असती तर लखनऊमध्ये मी एवढ्या लहानशा घरात का राहिली असती? विकास दुबेची संपत्ती विदेशात असती तर मी तिथेच जाऊन राहिली असती असंही ऋचाने स्पष्ट केलं.
विकास दुबेने ८ पोलिसांना मारल्याची बातमी मी टीव्हीवर पाहिली होती. विकास मला काहीही सांगत नव्हता, तो मला फक्त खर्चासाठी पैसे पाठवत होता. मी विकासच्या घरी म्हणजेच सासरी जायची पण ते इच्छा नसताना. सासरच्या अर्ध्या लोकांना मी ओळखतही नाही. मी मुलांना घेऊन तिथे सकाळी जात असे आणि संध्याकाळी परतत असे असंही ऋचाने सांगितलं. माझ्या मुलांना मी गुन्हेगारी जगतापासून दूर ठेवलं आहे. विकास दुबे या गँगस्टरची ही मुलं आहेत अशी त्यांची ओळख व्हावी हे मला वाटत नाही असं मला वाटतं असंही ऋचाने या मुलाखतीत सांगितलं आहे. उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेला आज उत्तर प्रदेश पोलिसांनी १० जुलै रोजी एन्काउंटरमध्ये ठार केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 11:05 pm