27 February 2021

News Flash

…आणि त्याने आपल्याच पत्नीचे प्रियकरासोबत लावून दिलं लग्न

उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील घटना

शांती, रवी आणि सुजीत (फोटो साभार टाइम्स ऑफ इंडिया)

लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. मात्र सर्वच लग्न यशस्वी ठरतात असं नाही. अयशस्वी लग्नांवर आधारित अनेक चित्रपट आतापर्यंत मोठ्या पडद्यावर आले आहेत. मात्र याच चित्रपटांपैकी एक असणाऱ्या ‘हम दिल दे चुके सनम’च्या कथानकाला साजेशी घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये घडली आहे. येथील एका तरुणाने लग्नानंतर अवघ्या तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले आहे. हा संपूर्ण प्रकार कानपूरमधील सानीगवान गावामध्ये घडला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार १९ फेब्रुवारी रोजी सानीगवान गावातील सुजीत या तरुणाचे लग्न शांती या तरुणीशी झाले. मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले. लग्नानंतर शांती स्वत:च्या माहेरी गेली बरेच दिवस झाले तरी सासरी परतली नाही. नंतर शांतीचे लग्नाआधी एक प्रेमप्रकरण होते आणि तिच्या इच्छेविरुद्ध घरच्यांनी तिचे लग्न लावून दिल्याचे सुजीतला समजले. “अनेक दिवस शांती परत न गेल्याने सुजीतने सासरवाडीला येऊन तू परत का आली नाहीस याबद्दल तिला जाब विचारला. अनेक आढेवेढे घेतल्यानंतर अखेर तिने सुजीतला स्वत:च्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले. लखनौमधील एका मुलाशी आपले प्रेमप्रकरण सुरु असल्याचे घरी समजल्यानंतर आपल्या इच्छेविरुद्ध लग्न लावून दिल्याचे त्याला सांगितले,” अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

शांतीने आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितल्यानंतर सुजीतला धक्काच बसला. आधी त्याला ही गोष्ट पचवणे कठीण गेले. मात्र त्याने हे सर्व काही लवकर समजल्याबद्दल समाधान व्यक्त केले. “शांतीने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर सुरुवातीला माझ्या मनात अनेक नकारात्मक विचार आले. मी या दोघांना संपवण्याचाही विचार केला होता. पण मी असं केलं असतं तर तिघांबरोबरच त्यांच्या कुटुंबाचेही आयुष्य उध्वस्त झालं असतं. त्यामुळेच मी घरातील वरिष्ठांशी चर्चा केली आणि सर्वांनाच आनंदात राहता येईल असा निर्णय घेण्याचे ठरवले,” असं सुजीत सांगतो.

सुजीतने शांतीचा प्रियकर रवी याची भेट घेतली आणि तिचे लग्न रवीशी लावून देण्याचा निर्णय़ घेतला. यासंदर्भात सुजीतने स्थानिक पोलिसांनाही माहिती दिली. ‘सुजीतचे हे पाऊल खूपच कौतुकास्पद आहे,’ असं मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बुधवारी तिन्ही कुटुंबातील सदस्यांनी गावातील हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये या दोघांचे थाटामाटात लग्न लावून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 1:40 pm

Web Title: kanpur man helps wife get married to lover just 3 months after his wedding with her scsg 91
Next Stories
1 Chandrayaan-3: नोव्हेंबर २०२० मध्ये चंद्रावर लँडिंगचे लक्ष्य, इस्रोकडून मिशनची तयारी सुरु
2 Vodafone भारतातून गाशा गुंडाळणार नाही , सीईओंनी घेतला यु-टर्न
3 “बोलताना काळजी घ्या”, राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
Just Now!
X