मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर अतिशय गाजलेल्या दिल्लीतील मालविया नगर परिसरातील ‘बाबा का ढाबा’च्या नावावर पैशांची अफरातफर केल्या गेल्याचे समोर येत आहे. ही अफरातफर या ढाब्याचे मालक ८० वर्षीय कांता प्रसाद व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यास मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये केली गेली असल्याचे म्हटले जात आहे.

प्रकरणी यू-ट्यूबर लक्ष्य चौधरी याने काही दिवसांअगोदर आरोप केला होता की, या दाम्पत्याच्या मदतीसाठी देण्यात आलेले पैसे कांता प्रसाद यांच्या पर्यंत पोहचलेच नाही. गौरव वासवान ज्याने सर्वप्रथम या बाबांचा व्हिडिओ बनवला होता. त्याने मदतीसाठी ऑनलाईन कॅम्पेन चालवून पैसे गोळा केले व ते कांता प्रसाद यांना दिलेच नाही. हे पैसै गौरव वासवान व त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होत होते.

या पार्श्वभूमीवर आता बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी यूट्यूबर गौरव वासनविरोधात पैशांचा घोटाळा केल्याची तक्रार मालवीयनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी देखील तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले असून, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. सध्यातरी या प्रकरणी एफआयआर दाखल केलेला नाही.

सुनील शेट्टी, स्वरा भास्कर, रवीना टंडन अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी आवाहन केलं होतं. याशिवाय, क्रिकेटर आर. अश्विन, अभिनेता रणदीप हुडा, सोनम कपूर यांनीसुद्धा या वयोवृद्ध जोडप्याची मदत केली आहे. रणदीप हुडाने ‘बाबा का ढाबा’चा पत्ता ट्विटरवर लिहित लोकांना तिथे जाऊन मदत करण्याची विनंती केली होती. तर ”बाबा का ढाबा’. दिल्लीवालो दिल दिखाओ. जो कोणी इथे येऊन जेवेल त्यांनी मला एक फोटो पाठवा. तो फोटो मी सोशल मीडियावर शेअर करेन. सोबतच तुमच्यासाठी एक खास मेसेजदेखील पाठवेन”, असं आवाहन रविनाने नेटकऱ्यांना म्हटलं होतं.