दिल्लीतील मोतीनगर येथे कारची तोडफोड करणाऱ्या कावडीयांमधील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल उर्फ बिल्ला असे त्याचे नाव आहे. त्याला अमली पदार्थाचे व्यसन असून चोरीच्या गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे.

दिल्ली आणि उत्तर भारतातील अन्य राज्यांमध्ये सध्या कावड यात्रा सुरु आहे. शंकराचा जयघोष करत या कावड यात्रा निघतात. यात सहभागी होणाऱ्या भाविकांना ‘कावडिया’ असे म्हणतात. मात्र, यंदा कावड यात्रेतील कावडियांनी रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

दिल्लीतील मोतीनगर येथे सात ऑगस्ट रोजी कावडियांनी कारची तोडफोड केली होती. कारचा धक्का लागल्याने हा वाद झाला होता. कारमधील तरुण आणि तरुणी घोळक्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने अनर्थ टळला होता. कारची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची पोलिसांनाही दखल घ्यावी लागली. कारमालकाने तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. अखेरीस पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. यातील पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली असून राहुल उर्फ बिल्ला असे त्याचे नाव आहे. त्याची चौकशी सुरु असून अन्य आरोपींचाही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्लीतील घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूर येथेही कावडियांनी कारची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. कारने धक्का दिल्याने कावडिया संतापले आणि त्यांनी कारची तोडफोड केली.

दरम्यान, यंदा कावडियांनी रस्त्यावर धुडगूस घातल्याने उत्तर भारतातील राज्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही अनेक जण यावर नाराजी व्यक्त करत आहे.