दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन गदारोळ सुरु असतानाच योगेंद्र यादव आणि डॉ़. कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांची पाठराखण केली आहे. केजरीवाल हे कधीच लाच स्वीकारणार नाही असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. तर केजरीवालांवर असे गंभीर आरोप करताना पुरावेही दिले पाहिजे असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेले कपिल मिश्रा यांनी रविवारी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. केजरीवाल यांना सत्येंद्र जैन या मंत्र्याकडून २ कोटी रुपये स्वीकारताना बघितले होते असे कपिल मिश्रा यांनी म्हटले होते. कपिल मिश्रांच्या आरोपानंतर काँग्रेस आणि भाजपने आपवर टीकेची झोड उठवली आहे.

विरोधक आक्रमक झाले असताना अरविंद केजरीवाल यांच्या मदतीला त्यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव धावून आले आहेत. केजरीवाल यांच्यावर अहंकार, हुकूमशहा वृत्ती असे आरोप झाल्यास ते समजू शकतो. पण भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करताना ठोस पुरावे देणे गरजेचे आहे असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. कपिल मिश्रांकडे जर पुरावे होते तर ते आत्तापर्यंत गप्प का बसले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवालांवर नाराज असलेले डॉ. कुमार विश्वास यांनीदेखील केजरीवाल यांची पाठराखण केली आहे. केजरीवालांवरील आरोप ऐकून मलाही वाईट वाटले. हे सर्व आरोप निराधार आहेत असे विश्वास यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल लाच घेतील असा विचार त्यांचा कट्टर शत्रूही कधी करु शकणार नाही असेही त्यांनी नमूद केले. बिनबुडाचे आरोप करुन पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळतो. असे आरोप करताना सर्वांनीच सावध राहणे गरजेचे असते. आता कपिल मिश्रा यांची पक्षातून हकालपट्टी करायची की नाही याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असे विश्वास यांनी म्हटले आहे.

आपचे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनीदेखील केजरीवालांचे समर्थन केले. अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावर त्यांचे शत्रूदेखील शंका घेणार नाही. मंत्रीपद गेल्याने चिडलेल्या कपिल मिश्रा यांनी केलेले आरोप हे निंदनीय आहेत असे सिंह यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांचे आजी -माजी सहकारी त्यांच्या मदतीला धावून आल्याने या प्रकरणात कपिल मिश्रा हे एकाकी पडण्याची चिन्हे आहेत.