दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आम आदमी पक्षाचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवालांना थेट आव्हान दिले आहे. अरविंद केजरीवाल यांना खुले पत्र लिहून मिश्रा यांनी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले आहे. केजरीवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचेदेखील मिश्रा यांनी खुल्या पत्रात म्हटले आहे.

‘तुम्ही मला माझ्या मतदारसंघातून काढण्याचा प्रयत्न करत आहात. मी तुम्हाला कोणत्याही मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान देतो. माझ्या करावाल नगर मतदारसंघात किंवा तुमच्या नवी दिल्ली मतदारसंघात आमनेसामने निवडणूक लढवून दाखवा. जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुमच्यासोबत आहेत, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे,’ असे कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘मी केजरीवालांना खुले पत्र लिहित आहे. मी आज सीबीआयकडे तक्रार दाखल करणार आहे. मी ज्या व्यवहारांविषयी बोललो नाही, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. मला सर्व गोष्टींची कल्पना आहे. मी सीबीआयला सर्व काही सांगणार आहे. केजरीवाल जे करायचे तेच मी करणार आहे,’ असे कपिल मिश्रा यांनी पत्रात म्हटले आहे. भ्रष्टाचारविरोधी लढाईत केजरीवालांचे आशीर्वाद कायम असावेत, अशी अपेक्षादेखील मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.

‘ज्या केजरीवाल यांच्याकडून मी भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यास, सत्यासाठी संघर्ष करण्यास शिकलो, त्याच केजरीवालांविरोधात मी आज लढा देणार आहे. कालपासून माझ्याकडे पक्ष आणि सरकारविरोधात २११ तक्रारी आल्या आहेत. मागील दोन वर्षात झाले, ते अत्यंत वेदनादायी आहे. तुम्ही आणि तुमच्या काही सहकाऱ्यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे,’ असे म्हणत कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर शरसंधान साधले आहे.

दरम्यान दिल्ली सरकारने विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले असून ते अतिशय वादळी ठरण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदार कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर केलेल्या आरोपांचा मुद्दा या अधिवेशनात सरकारसाठी अडचणीचा ठरु शकतो.