पवनकुमार बन्सल आणि अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागेवर सी.पी.जोशी यांच्याकडे प्रभारी रेल्वेमंत्रीपद आणि कपील सिब्बल यांच्याकडे कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. कायदे आणि रेल्वेमंत्रालय या दोन्ही महत्वाच्या जागा पवनकुमार बन्सल आणि अश्विनीकुमार यांच्या  राजीनामानंतर रिक्त झाल्या होत्या त्यामुळे या जागांवर कोणाची वर्णी लागेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या जागा भरून काढण्यासाठी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आणि कपील सिब्बल आणि सी.पी.जोशी यांची वर्णी लागली.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांची रेल्वे मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्याच्या बदल्यात बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याने ९० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून गेल्या आठवडय़ात सीबीआयने धडक कारवाई सुरू केल्यामुळे बन्सल यांचे मंत्रिपद धोक्यात आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. तर, सर्वोच्च न्यायालयात सीबीआयचे प्रमुख रणजीत सिन्हा यांनी कोलगेट तपासाबाबतच्या स्थितीदर्शक अहवालात कायदामंत्री अश्वनीकुमार यांनी फेरफार केल्याची कबुली दिल्यानंतर अश्वनी कुमार यांचे आसन डळमळीत झाले आणि बन्सल यांच्या पाठोपाठ कायदा मंत्री अश्वनीकुमारही पंतप्रधानांना भेटले व त्यांनी आपला राजीनामा दिला.