चीनहून कराचीच्या कासिम बंदराकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला गुजरातच्या कांडला बंदरावर रोखण्यात आले आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन फेब्रुवारीला या जहाजाला कांडला बंदरावर रोखण्यात आले. कस्टम विभागाने या जहाजाला ताब्यात घेतले असून, सध्या या जहाजावरील सामानाची कसून तपासणी सुरु आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) या जहाजाची तपासणी सुरु आहे. या जहाजावर ऑटोक्लेव्ह नावाचा एक मोठा भाग असून, त्याच्या तपासणीसाठी या आठवडयात अण्वस्त्र विभागाची दुसरी टीम पाठवण्यात येणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे ?
Da Cui Yun या जहाजाचे नाव आहे. चीनच्या जियांग सू प्रांतातील जियांगयीन बंदरातून हे जहाज कराचीच्या कासिम बंदराकडे जाण्यासाठी निघाले होते. हे जहाज कांडला बंदरात थांबलेले असताना, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ताब्यात घेण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना आणि गुप्तचर यंत्रणांना या जहाजासंबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि परराष्ट्र मंत्रालयाने यावर काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

या जहाजामध्ये असं काय आहे?
या जहाजावर ऑटोक्लेव्ह नावाचा एक मोठा भाग आहे. या ऑटोक्लेव्हचा वापर विविध औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रक्रियांसाठी केला जातो. नागरी आणि लष्करी उद्देशाच्या पूर्ततेसाठी ऑटोक्लेव्हचा वापर होऊ शकतो. बॅलेस्टिक मिसाइलच्या लाँचिंगसाठी सुद्धा ऑटोक्लेव्ह वापरले जाते. डीआरडीओच्या एका टीमने आधीच या भागाची पाहणी केली आहे. डीआरडीओची मिसाइल शास्त्रज्ञांची दुसरी टीम आता या जहाजाची तपासणी करण्यासाठी जाणार आहे. पहिल्या टीमचा निष्कर्ष दुसऱ्या टीमने कायम ठेवला तर, कस्टम विभाग हे जहाज जप्त करेल व नियम भंग केल्याप्रकरणी जहाज कंपनीवर कारवाई करण्यात येईल.

चीन पाकिस्तानला देणार आहे -११ बॅलेस्टिक मिसाइल
पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला चीन ९० च्या दशकापासून मदत करत आहे. तीच भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी आहे. पाकिस्तानने चीनबरोबर ३४ एम-११ बॅलेस्टिक मिसाइल खरेदी करण्याचा करार केला आहे. या एम-११ मिसाइल्समध्ये ३०० किलोमीटरपर्यंत ५०० किलो पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. या जहाजावरील ऑटोक्लेव्हचा मिसाइल डागण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे.