भाजपाचा हा ऐतिहासिक विजय आहे. कर्नाटकातील जनतेचे आभार.. आता देशात काँग्रेस खोजो अभियान चालेल, काँग्रेस कुठं असेल सांगता येणार नाही, असा टोला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी काँग्रेसला लगावला. कर्नाटकात भाजपाच्या कामगिरीवर त्यांनी आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांचेही आभार मानले.

कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याच्या शक्यतेला भाजपाच्या विजयी घौडदौडीने खोटे ठरवले. सध्या भाजपा १२० जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा पार केलेल्या भाजपाकडून देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

जेडीएसशी युती करण्याचा प्रश्नच नाही, भाजपाचे स्पष्टीकरण

दरम्यान, माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर (जेडीएस) किंगमेकर ठरण्याची शक्यता सर्वच मतदानोत्तर चाचणीत दिसून आली होती. परंतु, देवेगौडा यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बहुमताकडे वाटचाल करत असलेल्या भाजपाने आम्हाला जेडीएसची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी भाजपाने बहुमताचा आकडा पार केला असल्याने आम्हाला जेडीएसशी आघाडी करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे किंगमेकर होण्याचे जेडीएसचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरेल असे सध्याच्या चित्रावरून तर दिसून येते.