कर्नाटकमधील राजकीय पेच सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यात भाजपाला अपयश आले असले तरी त्यांच्याकडून सत्ता स्थापण्याचा पुरेपर प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, एका काँग्रेस आमदाराने पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाने आपल्याला मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमरगौडा पाटील असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे. काँग्रेसचे सहा लिंगायत आमदार नाराज असल्याचे वृत्त काही माध्यमांत आले होते. त्याचदरम्यान पाटील यांनी हा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी भाजपाकडून काँग्रेस आणि जेडीएस आमदारांना इडी आणि प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्याची धमकी दिली जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

मंगळवारी सकाळी मतमोजणीवेळी भाजपाने १२० हून अधिक जागांवर आघाडी घेतली होती. परंतु, नंतर ही आघाडी कमी होत १०४ वर स्थिरावली. त्यामुळे भाजपाला बहुमतासाठी आवश्यक असलेला ११३ हा जादुई आकडा गाठण्यात यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेस ७८ आणि जेडीएस यांनी ३७ जागा पटकावल्या. या दोन्ही पक्षांनी आघाडी करत सत्ता स्थापन करण्यार असल्याचे म्हटले आहे.

विधानसभेची ही स्थिती पाहता एकमेकांना सत्तेपासून रोखण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी संध्याकाळपासूनच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

मला भाजपाच्या एका नेत्याने फोन केला होता. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मंत्री करून. त्यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिली. पण त्यांच्याबरोबर न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. एचडी कुमारस्वामी आमच्याकडून मुख्यमंत्री असतील, असे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.