कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीत रंगत येत असल्याचे दिसत आहे. भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक युद्धाने राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून गेले आहे. प्रचाराच्या भाषणात आता एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हाने दिले जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हातात कागद न घेता १५ मिनिटे सिद्धरामय्या सरकारच्या उपलब्धेतवर बोलण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चामराजनगर येथील सभेत दिले होते. काँग्रेसकडून मोदींना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधानांनी सलग १५ मिनिटे खरे बोलून दाखवण्याचे आव्हान महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी मोदींना दिले आहे. मोदींकडे जय शाह, राफेल करार आणि पियूष गोयल यांच्या प्रकरणाबद्दल कोणतेच उत्तर नाही. राहुल गांधी ज्या पण भाषेत बोलतील ते सत्य बोलतील. राहुल यांनी पंतप्रधानांना राफेल करारावर बोलण्याबाबत विचारले आहे. पंतप्रधान १५ सेकंद तरी भ्रष्टाचार आणि महिला सुरक्षेवर बोलतील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

‘आज तक’ या वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सुष्मिता देव यांनी मोदींच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संसदेत आम्हाला १५ मिनिटे जरी बोलण्यास दिली तर मोदी बसू ही शकणार नसल्याचे म्हटले होते. हाच मुद्दा घेत मोदींनी प्रचारसभेत राहुल यांच्यावर हल्लाबोल केला होता. राहुल यांनी कागद न घेता सलग १५ मिनिटे बोलावे आणि विश्वेश्वरय्या ५ वेळा म्हणण्याचे आव्हान दिले होते. राहुल हे भावनेच्या भरात मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला होता. मोदींच्या या भाषणानंतर काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिले होते. मोदींनी येदियुरप्पा यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील कामगिरीविषयी १५ मिनिटे बोलण्याचे आव्हान विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते. त्यानंतर सुष्मिता देव यांनी मोदींवर निशाणा साधला.

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह, राफेल करार आणि पियूष गोयलप्रकरणी मोदी मौन बाळगतात. याविषयावर त्यांनी बोलावे. त्यांनी सलग १५ मिनिटे खोटे न बोलता खरे बोलून दाखवावे, असे आव्हानच देव यांनी दिले.

दरम्यान, येत्या १२ मे रोजी कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दि. १५ मे रोजी मतमोजणी होत आहे. सर्वच पक्षांनी जोमात प्रचार सुरू केला असला तरी खरी लढत काँग्रेस, भाजपा आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात आहे.