कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. आज (गुरूवार) सकाळी पंतप्रधान मोदी यांनी नमो अॅपच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका केली होती. तर नंतर राहुल यांनीही भाजपा आणि कर्नाटकमध्ये मोदींच्या प्रचारसभांवरून हल्लाबोल केला. भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत ते म्हणाले की, भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात जाऊन आले आहेत. दलित आणि महिलांवरील अत्याचारावही मोदींचे मौन असते असे म्हणत मोदी आपल्यावर वैयक्तिक हल्ला करत असल्याचा आरोप त्यांनी केला. माझी आई इटलीची आहे. पण या देशासाठी तिने खूप काही सहन केले व त्यागही केला आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या तोंडी अशी भाषा शोभून दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

ते म्हणाले, आम्ही कर्नाटकसाठी मनरेगाकडून ३५ हजार कोटी रूपये दिले होते. भाजपाच्या रेड्डी बंधुंनी इतक्याच पैशांचा घोटाळा केला. भाजपाने अशा लोकांना उमेदवारी दिली आहे. येडियुरप्पा भ्रष्टाचाराच्या आरोपखाली तुरूंगात जाऊन आले आहेत. मोदी राफेल व्यवहाराला शानदार म्हणतात. मी पण तेच म्हणतो हा व्यवहार चांगलाच आहे. पण मोदींच्या मित्रांसाठी तो व्यवहार चांगला आहे, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींना टोला लगावला.

मोदी आणि भाजपाकडून आपल्यावर वैयक्तिक हल्ले होत असल्याचे सांगताना राहुल थोडे भावूक झाले. माझी आई इटलीची आहे. पण या देशासाठी तिने खूप काही सहन केले आणि त्यागही केला. पंतप्रधानांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या तोंडात अशी भाषा शोभून दिसते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला. हे कोणत्या स्तरावरील राजकारण आहे? असे त्यांनी म्हटले.