कर्नाटकात भाजपाला मिळालेल्या यशाबाबत देशातील अनेक राजकीय पक्षांना धक्का बसल्याचे दिसते. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी कर्नाटकमध्ये भाजपाची बहुमताकडे सुरू असलेली वाटचाल पाहून अप्रत्यक्षरित्या आश्चर्य व्यक्त केले आहे. उमर यांनी ट्विट करत “Et tu, #karnataka” (कर्नाटक, तुम्ही ही), असे लॅटिन भाषेत ट्विट केले आहे. एखाद्या व्यक्ती, विशेषत: मित्राकडून झालेल्या विश्वासघाताला अधोरेखित करण्यासाठी लॅटिन भाषेत या शब्दाचा वापर केला जातो.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाने चांगले यश मिळवले आहे. परंतु, दुपारपर्यंत त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पण भाजपाच सत्तेवर येण्याची मोठी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या विजयामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू दिसून आली. राज्यात येडियुरप्पा यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांचाही या विजयात मोठा वाटा आहे. या कामगिरीमुळे भाजपाशासित मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे.

राज्यात २२४ विधानसभा मतदारसंघापैकी २२२ जागांवर १२ मे रोजी मतदान झाले होते. आर.आर.नगर मतदारसंघात गोंधळाच्या तक्रारीमुळे तेथील मतदान स्थगित करण्यात आले होते. तर जयनगर मतदारसंघात भाजपा उमेदवारच्या निधनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.