कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली आहे. सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रचंड चढाओढ लागली असून प्रचारातही ते दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे कर्नाटकात प्रचारासाठी आल्यानंतर हिंदूंच्या धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत. यावरून केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे नाटक करत असून काँग्रेस ड्रामा कंपनी असल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधींना निवडणुकीच्या वेळीच हिंदू धर्म नावाचा एक धर्म असल्याचे समजते, असा टोलाही त्यांनी लगावला.

बेळगावी येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते. आज राहुल गांधींना लक्षात आले आहे की, हिंदू धर्म आहे. त्यामुळेच त्यांनी मंदिर आणि मठांमध्ये आपल्या फेऱ्या वाढवल्या आहेत, असे ते म्हणाले.

या माणसाला तीर्थ कसे घेतात हेही माहिती नाही. कारण त्यांना कोणीतरी सल्ला दिल्यामुळे ते रूद्राक्ष माळा घालून मंदिरात जातात. टोपी घालून मशिदीत जातात आणि क्रॉस घेऊन चर्चमध्ये जातात. त्यांना नाटक करायचे आहे.. आणखी काही नाही, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला.

हेगडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. संविधनावरून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी त्यांनी नंतर माफीही मागितली होती. गेल्याच आठवड्यात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती.