कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्षाचे नेते ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, के. चंद्रशेखर राव आणि बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याबरोबर चर्चा केली होती. इतकेच नव्हे तर धर्मनिरपेक्षताच्या आधारावर भाजापाविरोधात उभे राहून काँग्रेसची साथ देण्यास सांगितले होते. यापूर्वी ममता बॅनर्जींनी निवडणुकीपूर्वी देवेगौडांना काँग्रेसशी युती झाल्यास चांगली कामगिरी करता येईल असे म्हटले होते. दरम्यान, भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळतील असा दुपारपर्यंत अंदाज नव्हता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९० पेक्षा कमी जागा मिळाल्यास एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापण्यासाठी जेडीएसला पाठिंबा देण्याचे काँग्रेसने निश्चित केले होते. रविवारी रात्री जेव्हा गुलाम नबी आझाद यांनी जेडीएसचे दानिश अली यांची भेट घेऊन त्यांना हा प्रस्ताव सादर केला होता. तसेच जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर वेळ न दवडता दोन्ही पक्षांनी निर्णय घेऊन सरकार बनवण्याचा दावा करावा. सोमवारी रात्री कुमारस्वामी सिंगापूरहून परतताच त्यांना काँग्रेसने पाठिंबा देण्याचा संदेश दिला होता. देशातील सर्वांत जुन्या पक्षाकडून आपल्याला मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा पाहून कुमारस्वामींना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी हा संदेश देवेगौडा यांच्यापर्यंत ही पोहोचवला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे देवेगौडांच्या संपर्कात होते. काँग्रेसचा पराभव होण्याचे स्पष्ट झाल्यानंतर साडेबारा वाजता गुलामनबी आझाद यांनी जेडीएसशी संपर्क साधून विनाशर्त पाठिंबा देण्याची भूमिका मांडली. हा निर्णय हायकमांड स्तरावरून झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचाही समावेश होता, असे आझाद यांनी सांगितले. विशेष म्हणजे देवेगौडा यांचा बालेकिल्ला असलेल्या हसन मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी झाला. याचा कुमारस्वामींनाही धक्का बसल्याचे सांगण्यात येते.

जेडीएस ही भाजपाची बी टीम असल्याचे प्रचारात सांगण्यात आले होते. त्यामुळेच मुस्लीम मतदार काँग्रेसकडे आकर्षित झाल्याने जेडीएससचे नुकसान झाल्याचे कुमारस्वामींना वाटते. इतकेच नव्हे तर मंडा येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जेडीएसला संघ परिवार म्हटले होते. त्यामुळे मतदारांमध्ये जेडीएस भाजपाबरोबर जाणार असल्याचे संकेत गेले.