कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायचा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत. आपल्या पहिल्याच सभेत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर तोंडसुख घेतले. परंतु, मोदींच्या तडाखेबंद भाषणावर प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान जेव्हा मंचावरून बोलत होते. त्याचवेळी लोक त्यांच्यावर हसत होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हे आहे प्रकाश राज यांचे ट्विट..

मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात तीन जाहीर सभा घेतल्या. एका ठिकाणी ते जेव्हा भाषण करत होते. त्यावेळी मोठा गोंधळ सुरू होता. यातील काही लोक मोठमोठ्याने हसत होते. प्रकाश राज यांनी यावरूनच पंतप्रधानांना लक्ष्य केले.

प्रिय मोदीजी आज जेव्हा तुम्ही कर्नाटकात मंचावर उभे होता. तेव्हा लोक तुमच्यावर हसताना तुम्ही पाहिलं का ? तुम्ही दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली. तुम्ही पण वाराणसी आणि बडोद्यातून निवडणूक लढवली होती. ते जाऊ द्या, विकासाच्या नावावर तुम्ही आता कधी मत मागणार आहात, काही नाही फक्त विचारत आहे, अशा उपहासात्मक शैलीत प्रकाश राज यांनी मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला.

प्रकाश राज यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदी आणि भाजपावर शाब्दिक हल्ला केला आहे. नुकतेच त्यांनी कर्नाटकवासियांना या निवडणुकीत भाजपाला मत न देण्याचे अपील केले होते. भाजपाची तुलना त्यांनी कर्करोगाशी केली होती. जर या विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्तेवर आली तर मी असुरक्षित असेल, असे त्यांनी म्हटले होते. कलबुर्गीत माझ्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. माझ्या कारवर दगडफेक केली. भाजपा सत्तेवर आली तर मी असुरक्षित असेन, असे ट्विट त्यांनी केले होते.