लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने दक्षिणेकडील राज्यांचा दौरा करत आहेत. याचअंतर्गत आज (सोमवार) कर्नाटकातील कलबुर्गी येथे त्यांची सभा होती. सभेत बोलण्यापूर्वी राहुल गांधी यांनी भाजपा नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली.

मनोहर पर्रिकर यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी रविवारी निधन झाले. मागील एक वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. राहुल गांधी यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थित नेत्यांनीही पर्रिकर यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली. या माध्यमातून त्यांनी मोठा संदेश देशाला दिला आहे.

कलबुर्गी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २३ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे हे उभे राहण्याची शक्यता आहे. या सभेत राहुल यांनी काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख केला.

दरम्यान, पर्रिकर आजारी असताना राहुल गांधी यांनी गोव्यात जाऊन त्यांची भेट घेतली होती. पर्रिकर यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी ट्विटही केले होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मला खूप दु:ख झाले आहे. एक वर्षभर ते धाडसाने या आजाराशी लढले. राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनीच त्यांना मान-सन्मान दिला. गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींपैकी ते एक होते.