भाजपाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ८२ उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी सांयकाळी जाहीर केली. या यादीत अनेक कलंकित नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे दिसून येते. मागील भाजपा राज्य सरकारमध्ये खाण घोटाळ्यातील आरोपी मंत्री जी. जर्नादन रेड्डी यांचे मोठे भाऊ जी. सोमशेखर रेड्डी यांना बेल्लारीतून (शहर) उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बलात्कार प्रकरणात आरोपी राहिलेला एक माजी आमदार आणि इतर गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन माजी आमदारांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. मागील वर्षीच हे दोन आमदार बलात्कार प्रकरणातून निर्दोष सुटले आहेत. त्याचबरोबर ८२ लोकांमध्ये दिवंगत मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र कुमार बंगारप्पा यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने राज्यातील सिद्धरामय्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.

सोमशेखर रेड्डी हे माजी आमदार आहेत. जे २०१३ मध्ये काँग्रेसच्या अनिल लाड यांच्याकडून पराभूत झाले होते. यावेळी पुन्हा एकदा बेल्लारी (शहर) मतदारसंघात २०१३ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसने पुन्हा एकदा अनिल लाड यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपाच्या आणखी दोन वादग्रस्त उमेदवारांमध्ये एस. एन. कृष्णैय्या शेट्टी आणि कट्टा सुब्रमण्यम नायडू यांचा नावाचा समावेश होतो. शेट्टी हे येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते. २०११ मध्ये येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणात तेही आरोपी होते. त्यांनी खासगी कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने सरकारी जमीन आपल्या नावे केली होती. नंतर येडियुरप्पा आणि शेट्टी यांना आरोपमुक्त करण्यात आले होते. नायडू हेही माजी मंत्री आहेत. लोकायुक्तांनी त्यांनी भ्रष्टाचाराप्रकरणी आरोपी केले होते.

भाजपाने आतापर्यंत १५४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात दोन महिला उमदेवार आहेत. तर काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यांनी १५ महिलांना उमदेवारी दिली आहे. भाजपाने आतापर्यंत अल्पसंख्याक समुदायातील एकालाही तिकीट दिलेले नाही. दि. १२ मे रोजी राज्यातील २२४ जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणाीर आहे. तर दि. १५ रोजी मतमोजणी होईल.