भाजपाचे नेते एस. एम. कृष्णा पुन्हा एकदा काँग्रेसचा हात हातात घेण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या राजकीय व़र्तुळात आज (दि. १०) याची चर्चा रंगली होती. परंतु, अद्यापपर्यंत या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. कृष्णा यांनी गतवर्षी भाजपात प्रवेश केला होता. कृष्णा यांच्या काँग्रेस प्रवेशाविषयी जेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

सिद्धरामय्या हे ‘एएनआय’शी बोलताना आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचे म्हटले. तर काँग्रेसचे दुसरे नेते के. रहमान खान यांनी मात्र पक्षात सर्वांचे स्वागत आहे. पण कृष्णांच्या प्रवेशाबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले.

दरम्यान, कृष्णा हे वर्ष १९९९ ते २००४ या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. कर्नाटकच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. प्राप्तिकर विभागाने मागील वर्षी त्यांचे जावई व्ही.जी.सिद्धार्थ यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी छापे मारले होते. कॅफे कॉफी डे या चेनची मालकी सिद्धार्थ यांच्याकडे आहे. छाप्यादरम्यान त्यांच्या विविध ठिकाणांहून ६५० कोटी रूपयांची अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली होती.

कृष्णा यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याचे वृत्त खोटे असल्याचे भाजपाचे प्रवक्ते ए. प्रकाश यांनी म्हटले. हे वृत्त निराश काँग्रेसने पसरवली आहे. याबाबत आता कृष्णा यांनाही समजले आहे. काँग्रेसमधून ते जेव्हा बाहेर पडले होते. तेव्हा त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. तेच लोक आता कृष्णा यांची आठवण काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. कर्नाटकात दि. १२ मे रोजी निवडणुका होणार असून १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.