महाराष्ट्रासोबत कर्नाटकलाही पुराचा मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने परिस्थिती पुर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पूरग्रस्त गावांचं पुनवर्सन करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली असून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु आहे. येडियुरप्पा यांनी पुरग्रस्त गावाला पुनर्वसन करण्यासाठी जी कंपनी १० कोटींची मदत करेल, त्या कंपनीचं नाव गावाला देण्यात येईल अशी घोषणा येडियुरप्पा यांनी केली आहे.

मदत निधी मिळवण्यासाठी येडियुरप्पा यांनी ही शक्कल लढवली आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जवळपास २२ राज्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे २०० गावांना स्थलांतर करावं लागलं आहे. यासाठीच येडियुरप्पा यांनी देशभरातील किमान ६० उद्योजकांची बंगळुरुत भेट घेतली होती.

आता गावाची नावं असतील ‘अदानी’, ‘अंबानी’ आणि ‘टाटा’
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, “एखाद्या गावातील मदत आणि पुनर्वसनासाठी जी कंपनी आर्थिक मदत देईल त्या कंपनीने संबंधित गावाला दत्तक घेतलं आहे असं मानलं जाईल”. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे चार कोटींची मदत जमा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक लोक ट्विट करत आता गावांची नावं ‘अदानी’, ‘अंबानी’ आणि ‘टाटा’ असतील असं म्हणत आहेत.