28 February 2021

News Flash

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात चार जुलै कसा ठरला निर्णायक दिवस, जाणून घ्या….

Kargil Vijay Diwas: भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध सुरु झाल्यानंतर भारताचे सर्वात महत्वाचे लक्ष्य होते ते म्हणजे काहीही करुन टायगर हिल परत मिळवणे. टायगर हिलला पॉईंट ५०६२

Kargil Vijay Diwas:

Kargil Vijay Diwas: भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध सुरु झाल्यानंतर भारताचे सर्वात महत्वाचे लक्ष्य होते ते म्हणजे काहीही करुन टायगर हिल परत मिळवणे. टायगर हिलला पॉईंट ५०६२ सुद्धा म्हटले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये द्रास-कारगिल सेक्टरमध्ये टायगर हिल आहे. टायगर हिल हे त्या भागातील सर्वोच्च शिखर आहे. घुसखोरांनी या हिलवर ताबा मिळवल्यामुळे भारताचा महत्वाचा भूप्रदेश थेट शत्रूच्या टप्प्यात येत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टायगर हिलची लढाई जिंकणे भारतासाठी आवश्यक बनले होते.

– टायगर हिलवरुन पाकिस्तानी सैनिक सहजतेने राष्ट्रीय महामार्ग एकवर नजर ठेऊ शकत होते. या शिखरावरुन श्रीनगर-लेह मार्ग तसेच ५६ ब्रिगेडचे लष्करी मुख्यालय टप्प्यात येत होते. कारगिल सेक्टरला जीवनावश्यक वस्तू आणि अन्य साहित्याचा पुरवठा याच मार्गावरुन व्हायचा. पाकिस्तानी सैन्य राष्ट्रीय महामार्गाच्या २५ कि.मी.च्या टप्प्यातील भारतीय लष्कराच्या हालचालींना सहज टार्गेट करत होते. त्यामुळे टायगर हिलची लढाई भारतासाठी अत्यंत महत्वाची बनली होती.

– टायगर हिलच्या लढाईत १८ ग्रेनेडीयन्स, २ नागा आणि आठ शिख रेजिमेंट सहभागी झाल्या होत्या. एकूण २०० जवान या मोहिमेवर होते. १८ ग्रेनेडियन्सने अल्फा, चार्ली आणि घातक अशी तीन तुकडयांमध्ये आपल्या सैनिकांची विभागणी केली. या सर्वात खडतर मिशनला तीन जुलैच्या संध्याकाळी सात वाजता सुरुवात झाली. शिखराकडे कूच करणाऱ्या सैनिकांच्या मदतीसाठी लष्कराच्या तोफखान्याने जोरदार मारा सुरु केला. रॉकेट लाँचर्सद्वारे शत्रूला टार्गेट केले.

– आठ शिख रेजिमेंटने शत्रूने गृहित धरलेल्या मार्गावरुन चाल केली. शत्रूला गोंधळात टाकण्याची त्यामागे रणनिती होती. त्याचवेळी घातक तुकडीकडे अत्यंत धोकादायक मार्गावरुन शिखरावर पोहोचण्याचे आव्हान होते. शत्रू कल्पनाही करु शकणार नाही अशा पद्धतीने धक्का देण्याचा त्यामागे उद्देश होता.

– दोरीच्या सहाय्याने भारताचे जवान पहाटे चारच्या सुमारास हिलवर पोहोचले. योगेंद्र सिंह यादव या मोहिमेचे नेतृत्व करत होता. त्याच्याकडे शिखरावर पोहोचून दोरी बांधण्याची जबाबदारी होती. योगेंद्र शिखराजवळ असताना शत्रूचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्यांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये कंपनी कमांडरसह तीन जवान शहीद झाले. योगेंद्रच्या खांद्यामध्ये गोळी घुसली. पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने चढाई सुरु ठेवली व शिखरापर्यंत पोहोचला. जखमी अवस्थेतही त्याने इतर सहका-यांची दोरखंडाच्या सहाय्याने कडयावर पोहोचण्याची व्यवस्था केली. शिखरावर उतरताच त्याने पाकिस्तानी पोस्टवर हल्लाबोल केला. ज्यामध्ये चार पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

– त्या रात्री टायगर हिलवर भारताच्या शूर जवानांनी आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला आणि शत्रूच्या ताब्यातून महत्वाचे ठिकाण पुन्हा मिळवले. चार जुलैला सकाळी टायगर हिलवर तिरंगा डौलाने फडकला. या घनघोर रणसंग्रामात पाच भारतीय जवान शहीद झाले तर दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या शौर्यासाठी योगेंद्र सिंह यादवला परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. टायगर हिल जिंकणे म्हणजे भारतासाठी मोठा रणनितीक विजय तर पाकिस्तानसाठी जबर मानसिक धक्का होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 5:02 am

Web Title: kargil vijay divas indian army capture tiger hill
Next Stories
1 Kargil Vijay Diwas : जाणून घ्या, ऑपरेशन विजयचे ‘ते’ १२ महानायक
2 Kargil Vijay Diwas: शहीद जवानाच्या नावे १९ वर्षांपासून तेवते आहे अखंड ज्योत!
3 Kargil Vijay Diwas : वचनपूर्ती! लहानपणी वडिलांचा गणवेश कापून साकारली होती जवानांची वेशभूषा
Just Now!
X