27 February 2021

News Flash

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या, ऑपरेशन विजयचे ‘ते’ १२ महानायक

Kargil Vijay Diwas सुमारे अडीज महिने चाललेल्या या 'ऑपरेशन विजय'मध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले

वीर भूमी कारगिल

Kargil Vijay Diwas २६ जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांच्या हृदयावर अभिमानाने कोरला गेलेला दिवस आहे. कारण याच दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करीत युद्ध जिंकले होते. सुमारे अडीज महिने चाललेल्या या ‘ऑपरेशन विजय’मध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. या विजय दिवसाचे शिल्पकार ठरलेल्या १२ महानायकांपैकी प्रत्येकाच्या शौर्याची गोष्टही रंजक आहे.

१) कॅप्टन अनुज नय्यर : जाट रेजिमेंटच्या १७ व्या बटालियनमध्ये हे कार्यरत होते. ७ जुलै रोजी ते टायगर हिलवर शत्रूशी दोन हात करताना शहीद झाले. कॅप्टन अनुज यांच्या वीरतेला सलाम करीत सरकारने त्यांना मरणोत्तर महावीर चक्र किताबाने सन्मानित केले.
२) कॅप्टन एन. केंगुर्सू : राजपुताना रायफल्सच्या दुसऱ्या बटालिअनमध्ये तैनात असलेले कॅ. केंगुर्सू कारगिल यु्द्धादरम्यान लोन हिल्सवर २८ जून रोजी शहीद झाले. युद्धभूमीवर शत्रूला पळवून लावणाऱ्या या वीराला सरकारने महावीर चक्रने गौरविले.
३) लेफ्टनंट शींग क्लिफोर्ड नोंगुर्म : हे जम्मू-काश्मीरच्या लाइट इन्फट्रीच्या १२व्या बटालिअनमध्ये होते. १ जुलै रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाली. कारगिल युद्धात पॉईंट ४८१२ ला शत्रूच्या तावडीतून सोडवताना ते शहीद झाले. त्यांनाही महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले.
४) मेजर पद्मपानी आचार्य : भारतीय लष्करातील राजपुताना रायफल्सच्या दुसऱ्या बटालिअनमध्ये ते कार्यरत होते. २८ जून १९९९ रोजी लोन हिल्सवर पाकिस्तानी सैन्याशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना महावीर चक्रने गौरविण्यात आले.
५) मेजर राजेश सिंह : कारगिल युद्धात ३० मे १९९९ रोजी ते शहीद झाले. त्यांच्या वीरतेसाठी त्यांना महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले.
६) कर्नल सोनम वांगचुक : कर्नल वांगचुक हे लडाख स्काऊट रेजिमेंटमध्ये अधिकारी होते. कारगिल युद्धादरम्यान शत्रूला पळवून लावताना कॉरवट लॉ टॉपवर ते शहीद झाले. त्यांनाही मरणोत्तर महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले.
७) मेजर विवेक गुप्ता : राजपुताना रायफल्सच्या दुसऱ्या बटालिअनमध्ये कार्यरत असणारे मेजर गुप्ता १२ जून रोजी द्रास सेक्टरमध्ये एका महत्वाच्या ठाण्यावर कब्जा करण्यासाठी निघाले असताना शहीद झाले. कारगिल युद्धातील त्यांच्या नायकत्वाला सलाम ठोकत सरकारने त्यांना महावीर चक्रने सन्मानित केले.
८) कॅप्टन मनोजकुमार पांडे : गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालिअनमध्ये ते कार्यरत होते. ऑपरेश विजयचे महानायक म्हणून त्यांची ओळख आहे. बटालिक सेक्टरमध्ये ११ जून रोजी त्यांनी शत्रूला सळो की पळो करुन सोडले होते. त्यांच्याच नेतृत्वात भारतीय सैन्याच्या तुकडीने जॉबर टॉप आणि खालुबर टॉप या भागात पुन्हा कब्जा केला होता. ३ जुलैचा तो दिवस होता. पांडे यांनी आपल्या जखमांचा विचार न करता या ठाण्यांवर तिरंगा फडकावला होता. त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी सैन्याचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्रने त्यांना सन्मानित करण्यात आले.
९) नायक दिगेंद्र कुमार : राजपुताना रायफल्समध्ये ते कार्यरत होते. कारगिल युद्धात त्यांच्या साहसी वृत्तीला सलाम करीत सरकारने त्यांना १९९९च्या स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी महावीर चक्रने सन्मानित केले.
१०) रायफल मॅन संजय कुमार : जम्मू आणि काश्मीर बटालियनच्या १३ व्या तुकडीत ते कार्यरत होते. ते स्काऊट गटाचे नेते होते. त्यांनी फ्लॅट टॉपवर आपल्या छोट्या तुकडीसह कब्जा केला होता. छातीवर शत्रूची गोळी खाणारे ते एक निडर योद्धा होते. गोळी लागल्यानंतरही ते लढत होते. कमी मनुष्यबळ असतानाही त्यांनी शत्रूला नामोहरम केले होते. या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना सरकारने परमवीर चक्रने गौरविले.
११) ग्रेनेडिअर योगेंद्र सिंह यादव : कमांडो घटक प्लाटूनचे नेतृत्व करणाऱ्या यादव यांनी एक रणनीती बनवून टायगर हिलवर शत्रूने बनवलेल्या बंकरवर हल्ला केला. आपल्या तुकडीसाठी त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने मार्ग बनवला होता. ४ जुलै रोजी ते शहीद झाले. त्यांच्या या अद्वितीय शौर्यासाठी त्यांनाही सर्वोच्च परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले.
१२) कॅप्टन विक्रम बत्रा : यांनी कारगिलच्या पॉइंट ४८७५ वर तिरंगा फडकावला होता. तसेच यावेळी त्यांनी ‘दिल मांगे मोअर’ अशी घोषणाबाजीही केली होती. विजयानंतर याच ठिकाणी ते धारातीर्थी पडले. जम्मू आणि काश्मीर बटालिअनच्या १३ व्या तुकडीत ते कार्यरत होते. विक्रम बत्रा यांनी तोलोलिंग येथे पाकिस्तान्यांनी बनवलेल्या बंकर्सवर कब्जा केला होता. इतकेच नव्हे तर शत्रूच्या माऱ्याची पर्वा न करता आपल्या सैनिकांना वाचवण्यासाठी ७ जुलै रोजी शत्रूला थेट भिडत तिरंगा फडकावूनच थांबले होते. याच जागेला आज बत्रा टॉप म्हणून ओळखले जाते. या शौर्यासाठी त्यांना सर्वोच्च परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 5:00 am

Web Title: kargil vijay diwas 2018 indian and pakistani armies know operation vijays those 12 brave harts
Next Stories
1 Kargil Vijay Diwas: शहीद जवानाच्या नावे १९ वर्षांपासून तेवते आहे अखंड ज्योत!
2 Kargil Vijay Diwas : वचनपूर्ती! लहानपणी वडिलांचा गणवेश कापून साकारली होती जवानांची वेशभूषा
3 Kargil Vijay Diwas : तिरंग्यामध्ये परतलं होतं तिचं प्रेम…, जाणून घ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेमकहाणीविषयी
Just Now!
X