काँग्रेसची भाजपवर टीका

नवी दिल्ली : कारगिल युद्धात सहभाग असलेल्या जवानाला आसाममधील एका लवादाने परदेशी नागरिक घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसने यावरून भाजप सरकारवर जोरजार टीका केली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेच्या अंमलबजावणीमध्ये मोठय़ा प्रमाणावर हस्तक्षेप होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

सदर जवानाचे नाव मोहम्मद सनाउल्लाह असे असून तो कामरूप जिल्ह्य़ातील कोलोहिकाश गावातील रहिवासी आहे. कामरूपच्या परदेशी नागरिकांच्या लवादाने सनाउल्लाह हे परदेशी नागरिक असल्याचे म्हटले आहे.

या जवानावर परदेशी नागरिक असा शिक्का मारणे हा धक्कादायक प्रकार आहे, हा सशस्त्र दलांच्या त्यागाचा अपमान आहे, एनआरसी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमध्ये किती मोठय़ा प्रमाणावर हस्तक्षेप केला जातो त्याचे हे द्योतक आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले आहे.

मतदार यादीत सनाउल्लाह यांचे नाव डी (डाऊटफूल) वर्गवारी यादीत समाविष्ट करण्यात आल्यानंतर २००८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, असे कामरूपचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजीव सैकिया यांनी सांगितले. लवादाच्या निर्णयाविरुद्ध गुवाहाटी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सनाउल्लाहच्या कुटुंबीयांनी सांगितले.