टेक्नॉलॉजी क्षेत्रात दबदबा असणारी ‘अॅपल’ या कंपनीने आता बंगळुरुत उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलच्या निर्णयाचे कर्नाटक सरकारने स्वागत केले असून अॅपलमुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा विकास होणार आहे. जागतिक स्पर्धेमध्ये भारताला याचा फायदा होईल असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

‘अॅपल’च्या प्रतिनिधी प्रिया बालसुब्रमण्यम (उपाध्यक्ष, आयफोन ऑपरेशन्स) आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी राज्यातील अधिकारी आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. यामध्ये दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली होते. उत्पादन क्षेत्रात नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्याची आमची योजना असून गुंतवणूकदारांसाठी चांगल्या वातावरणाची निर्मिती केली जाईल असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

अॅपलची प्रॉडक्ट्स भारतात उपलब्ध असली तरी या प्रॉडक्ट्सचे उत्पादन चीन, कोरिया अशा देशांमधल्या अॅपलच्या प्रॉडक्शन युनिटस् मधून होतं. भारतीय बाजारपेठेतला आपला ठसा वाढावा यासाठी आता असंच युनिट भारतात उभं करायचा अॅपलचा प्लॅन आहे.  मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतात डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळणार आहे. तसंच तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने अॅपल सारख्या टेक कंपनीला भारतीय बाजारपेठेतलं स्थान भक्कम करावसं वाटणं साहजिक आहे. त्या दृष्टीने अॅपलने प्रयत्न सुरू केल्याचं मानलं जातंय.

अॅपलच्या या प्रयत्नांना भारतीय कायद्यामधल्या काही अटी जाचक ठरत आहेत. परदेशी कंपनीने भारतात उत्पादन सुरू केलं तर ३०% कच्चा माल देशांतर्गत स्त्रोतांमधून घ्यावा यासंबंधी काही कायद्यांमध्ये तरतुदी आहेत. अॅपलच्या दृष्टीने हा कच्चा माल म्हणजे त्यांच्या उत्पादनांना लागणारे भाग असू शकतात. हे भाग बनवण्याची सोय सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याचं अॅपलचं म्हणणं होते. यावर काय तोडगा निघाला की अॅपलने या अटी मान्य केल्या हे अद्याप समजू शकलेले नाही.