केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केली असली तरी बेंगळुरूचा  गुलाबी कांदा (कर्नाटक) व आंध्रातील कृष्णापुरम कांदा यांच्यावरची निर्यातबंदी काही अटींवर मागे घेण्यात आली आहे. कांद्याच्या या दोन प्रजाती वगळता इतर कांद्यावर निर्यातबंदी लागू राहणार आहे.

१४ सप्टेंबरला केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यात बंदी लागू केली होती. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. बेंगळुरू गुलाबी कांदा व कृष्णापुरम कांद्याची १० हजार टनांपर्यंत निर्यात  करण्यास ३१ मार्च २०२१ अखेपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे परदेशी व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे.

व्यापार मंत्रालयाचा भाग असलेल्या महासंचालनालयाला आयात निर्यात प्रश्नावर निर्णयाचे अधिकार आहेत. चेन्नई बंदरावरून कांद्याची निर्यात करता येणार आहे. कर्नाटकच्या गुलाबी कांदा निर्यातदारांना त्यासाठी फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. कृष्णापुरम कांद्यासाठी आंध्र प्रदेशच्या उत्पादकांना तसेच प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी केंद्राला अशी विनंती केली होती की, बेंगळुरूचा गुलाबी कांदा १० हजार टनापर्यंत निर्यात करून द्यावा कारण त्याला देशी बाजारात काहीच मागणी नाही. या कांद्यात आग्नेय आशियातील मलेशिया, सिंगापूर, थायलंड, तैवान या देशात मागणी आहे. कृष्णापुरम कांद्याचा वापर भारतात केला जात नाही. त्याचा आकार व तिखटपणा वेगळा आहे. हे कांदे थायलंडस हाँगकाँग, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर या देशात निर्यात केले जातात.