कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा शिकारीपूरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. शिकारीपूरा विधानसभा मतदारसंघ येडियुरप्पांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. फक्त १९९९ साली शिकारीपूरा मतदारसंघातून महालिंगाप्पा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर येडियुरप्पांचा पराभव केला होता.

काँग्रेस उमेदवार गोनी मालातेषा पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात लिंगायत समाजाची मते निर्णायक असून येडियुरप्पा लिंगायत समाजाचे आहेत. त्याचमुळे ते भाजपाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले आहे. कर्नाटकात भाजपाचा विजय होईल व आपणच कर्नाटकाचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ असा दावा येडियुरप्पा यांनी केला आहे. भाजपाने २००८ साली येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात दणदणीत विजय मिळवल्यानंतर येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. पण नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अनेक अर्थाने महत्वाच्या असणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर या मतमोजणीला सुरुवात झाली. २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. त्यांपैकी आर. आर. नगर येथील गैरप्रकार तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने या दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

कर्नाटकात बाजी मारणारेच २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकतील
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता येत्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी मोठे भाकित वर्तवले आहे. कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल. कारण, जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल असे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटक निवडणुकीत दहा हजार कोटींचा खर्च?
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणुकीसाठी खर्च केलेल्या पैशांच्या अनुषंगाने कर्नाटक विधानसभेची गेल्या आठवडय़ात झालेली निवडणूक देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात खर्चीक ठरली आहे, असे ‘सेंटर ऑफ मीडिया स्टडीज’ या संघटनेने केलेल्या पाहणीत आढळले आहे.

कर्नाटकमध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया म्हणजे पैशांचा खेळ होता, असे या संघटनेने म्हटले आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी खर्च केलेली रक्कम ९५०० ते १० हजार ५०० कोटी रुपये इतकी होती. कर्नाटकमध्ये गेल्या निवडणुकीत झालेल्या खर्चापेक्षा दुपटीहून अधिक खर्च या वेळी झाला, असेही संघटनेने म्हटले आहे. या खर्चामध्ये पंतप्रधानांनी केलेल्या प्रचाराच्या खर्चाचा समावेश नाही, असा दावाही करण्यात आला आहे.