कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त दोन दिवस उरले असून काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्युलर या पक्षांचा प्रचार विकास आणि भ्रष्टाचार या मुद्यांभोवती फिरत होता. या पक्षांनी प्रचारात विकासाचे दावे करताना भ्रष्टाचारावरुन परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. राजकीय पक्षांनी प्रचारात विकासाच्या मुद्यावर कितीही भर दिला असला तरी प्रत्यक्षात जातीचा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.

प्रचारात राजकीय नेत्यांनी सांप्रदायिकता, धर्मनिरपेक्षता आणि संधीसाधूपणा अशी शब्दफेक केली असली तरी शेवटी सर्वात महत्वाची ठरणार आहे ती ‘जात’ असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. कर्नाटकात तिन्ही प्रमुख पक्षांनी लिंगायत आणि वोक्कालिगा समाजातून सर्वाधिक उमेदवार दिले आहेत.

काँग्रेसने ४९ लिंगायत आणि ४६ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे तर भाजपाचे ६८ लिंगायत आणि ३८ वोक्कालिगाना संधी दिली आहे. जेडीएसने ४१ लिंगायत आणि ५५ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे. एससी आणि एसटी समाजाची एकत्रित लोकसंख्याही मोठी असून या समाजाची मते सुद्धा दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जात फॅक्टर महत्वाचा आहे. तळागाळात जातीय समीकरणांचीच चर्चा आहे असे एका राजकीय विश्लेषकाने सांगितले. राजकीय पक्ष विकासाचा मुद्या दाखवत असले तरी सुरुवातीपासूनच या पक्षांचा जातीय समीकरणांवर भर राहिला आहे. त्यामुळेच बी.एस.येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरले. कर्नाटकात लिंगायत समाजाचा प्रभाव लक्षात घेऊनच भाजपाने येडियुरप्पाने मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी दिली.

त्याचप्रमाणे काँग्रेसही कुरुबा आणि अन्य मागासवर्गीय मतांवर अवलंबून आहे. जेडीएसच्या एचडी देवेगौडा यांची वोक्कालिगा समाजावर मदार आहे. भाजपाने इथे एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नाही. कर्नाटकात मुस्लिम मतदारांची संख्या ७५ लाख आहे. काँग्रेसने १७ आणि जेडीएसने १९ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम मतांसाठी या दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा आहे.