कर्नाटकात लिंगायत पाठोपाठ महत्वाच्या असलेल्या वोक्कालिगा समाजाने जनात दल सेक्युलरला साथ दिली आहे. वोक्कालिगा मतदारांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात २५ जागांवर जनता दल सेक्युलरचे उमेदवार आघाडीवर आहेत.

काँग्रेसने ४९ लिंगायत आणि ४६ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे तर भाजपाचे ६८ लिंगायत आणि ३८ वोक्कालिगाना संधी दिली आहे. जेडीएसने ४१ लिंगायत आणि ५५ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकात लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात भाजपा सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या २९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेस त्यातुलनेत बरीच पिछाडीवर पडली आहे. लिंगायत मते निर्णयाक असलेल्या मतदारसंघात काँग्रेस ९ आणि जनता दल सेक्युलर सहा जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकात काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्युलर या पक्षांचा प्रचार विकास आणि भ्रष्टाचार या मुद्यांभोवती फिरत होता. या पक्षांनी प्रचारात विकासाचे दावे करताना भ्रष्टाचारावरुन परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. राजकीय पक्षांनी प्रचारात विकासाच्या मुद्यावर कितीही भर दिला असला तरी प्रत्यक्षात जातीचा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.

प्रचारात राजकीय नेत्यांनी सांप्रदायिकता, धर्मनिरपेक्षता आणि संधीसाधूपणा अशी शब्दफेक केली असली तरी शेवटी सर्वात महत्वाची ठरणार आहे ती ‘जात’ असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले होते.