कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लिम व्यक्तिला उमेदवारी दिली नव्हती. पण कर्नाटकातील मुस्लिम समाजाने भाजपाच्या पारडयात भरभरुन मते टाकल्याचे सध्याच्या निकालावरुन दिसत आहे. सध्याचा निकालाचा कल पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघातून भाजपाच्या बाजूने मतदान झाल्याचे दिसत आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपाची मतांची टक्केवारी १४ वरुन ३६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात १० जागांवर भाजपा तर काँग्रेस ८ आणि जेडीएस ७ जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकात मुस्लिम मतदारांची संख्या ७५ लाख आहे. काँग्रेसने १७ आणि जेडीएसने १९ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम मतांसाठी या दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा होती. पण भाजपाने बाजी मारल्याचे दिसत आहे. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत मुस्लिम मतदारांमध्ये ६५ जागांवर प्रभाव पाडण्याची क्षमता असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

मागच्या तीस वर्षात कर्नाटक विधानसभेत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीत्व कमी झाले आहे. सध्याच्या विधानसभेत फक्त नऊ मुस्लिम आमदार आहेत. १९७८ साली सर्वाधिक १६ मुस्लिम आमदार कर्नाटक विधानसभेमध्ये होते. १९८३ साली रामकृष्ण हेगडे यांच्या कार्यकाळात फक्त दोन मुस्लिम आमदार कर्नाटक विधासभेमध्ये होते.