विधानसभेची ही निवडणूक कर्नाटकाचं भविष्य निश्चित करेल. फक्त आमदारांची निवड करण्यापुरता ही निवडणूक आहे असे समजू नका. महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचा विकास हे मुद्दे महत्वाचे आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलाबुर्गी येथील जाहीर सभेत म्हणाले. आपल्या भाषणातून मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

आपल्या जवानांनी जे बलिदान दिले त्याबद्दल काँग्रेसला अजिबात आदर नाहीय. जेव्हा आपल्या सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते माझ्याकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते असे मोदी म्हणाले. कर्नाटकाला शौर्याची परंपरा आहे. पण फिल्ड मार्शल करीअप्पा आणि जनरल थिमय्या यांना काँग्रेसने कशी वागणूक दिली ?

1948 साली पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांनी जनरल थिमय्या यांचा अपमान केला होता असा दावा मोदींनी केला. सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आपल्या लष्कर प्रमुखांना ‘गुंड’ म्हणाले होते असा आरोप मोदींनी केला. सर्जिकल स्ट्राईकसाठी जाताना आपल्या जवानांनी बंदुका नव्हे कॅमेरा घेऊन जावे असे काँग्रेसला वाटते. ‘वंदे मातरम’च्यावेळी मंचावर त्यांचे स्वत:चे वरिष्ठ नेते कसे वागत होते त्यावर मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मागच्या निवडणुकीत काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी दलित समाजाची दिशाभूल केली. राजकारण करण्याची काँग्रेसची ही पद्धतच आहे असे मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये कँडल मार्च काढणाऱ्या काँग्रेसला मला विचारायचे आहे. बिदरमध्ये जेव्हा दलित मुलीचा छळ झाला तेव्हा तुमच्या कँडल कुठे गेल्या होत्या ?