काँग्रेसला सहा रोग लागले असून काँग्रेस जिथे कुठे जाते तिथे हे रोग व्हायरल होतात. काँग्रेसची संस्कृती, सांप्रदायिकता, जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि कंत्राटदार सिस्टिम हे काँग्रेसचे सहा रोग कर्नाटकाचे भविष्य उध्वस्त करत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेद्र मोदींनी बुधवारी केला. ते कर्नाटकातील कोलारमधील बांगरपेट येथे जाहीरसभेला संबोधित करत होते.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला फक्त तीन दिवस राहिले असून प्रचाराची धार अधिक तीव्र झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल पंतप्रधानपदासंबंधी महत्वपूर्ण वक्तव्य केले. त्यावर आज मोदींनी राहुल यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काल कर्नाटकामध्ये कोणीतरी मी पंतप्रधान होणार म्हणून महत्वाची घोषणा केली. स्वत:लाच अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा नाही का ? असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला.

मोदीला हटवण्यासाठी मोठी सभा सुद्धा झाली असा दावा स्वत: मोदींनी केला. काँग्रेसला फक्त डील्समध्ये रस आहे. हे मी नाही, काँग्रेसचे खासदार आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली म्हणत आहेत असे मोदी म्हणाले. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी कॅमेरा घ्यावा आणि गरीबांच्या घरी जाऊन पाहावे ते कसे जगत आहेत.

घरात साधे टॉईलेट नसल्यामुळे गरीबांना कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागते त्याची त्यांना कल्पना नाही. काँग्रेस म्हणते मोदी फक्त श्रीमंतांसाठी काम करतात. मी तुम्हाला सर्वांना विचारतो. टॉईलेट बांधण्याचे काम श्रीमंतांसाठी आहे असे तुम्हाला वाटते का? ७० वर्षानंतर श्रीमंतांना वीजेची गरज आहे असे तुम्हाला वाटते का ? असे सवाल मोदींनी विचारले.