कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसची नाचक्की झाली आहे. देशात आता पंजाब आणि मिझोराम या दोन राज्यांमध्येच काँग्रेसची सत्ता असून देशातील फक्त २.२७ टक्के लोकांवरच काँग्रेसचे राज्य आहे.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी पार पडली. भाजपाने मॅजिक फिगरचा आकडा गाठल्याचे दिसते. तर सत्ताधारी काँग्रेसला फक्त ६४ जागांवरच समाधान मानावे लागेल, असे दिसते. कर्नाटकमधील सत्ता गमावल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला कर्नाटकमधील सत्ता टिकवणे महत्त्वाचे होते. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात प्रचाराचा धडाका लावला. पण कर्नाटकमधील गड राखण्यात त्यांना अपयश आले.

कर्नाटकमधील सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसकडे आता फक्त पंजाब, मिझोराम हे राज्य आणि पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेश आहे. यात पंजाबची लोकसंख्या २. ७७ कोटी, मिझोरामची १० लाख ९७ हजार आणि पुद्दूचेरीची लोकसंख्या १२ लाख ४८ लाख आहे. यानुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त २. २७ टक्के लोकांवर काँग्रेसचे राज्य आहे.