कर्नाटकमध्ये संख्याबळाचे गणित फिस्कटल्याने बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे वृत्त आहे. शपथविधीसाठी हजर असलेले काँग्रेसचे आमदार भोजनानंतर विधानसभेतून बाहेर पडतील, अशी भाजपाची योजना होती. पण ते आमदार अजूनही विधानसभेत असल्याने येडियुरप्पा यांना बहुमताचा आकडा गाठणे कठीण झाले आहे. त्यामुळेच बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पा राजीनामा देतील, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. मात्र, या वृत्तावर भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कर्नाटकमध्ये शनिवारी संध्याकाळी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. आम्ही शनिवारी १०१ टक्के बहुमत सिद्ध करु, असा दावा येडियुरप्पा यांनी केला होता. कर्नाटकमधील २२२ जागांपैकी भाजपा १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाने ३७ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती केली आहे. बहुमतासाठी भाजपाला आणखी सात आमदारांची आवश्यकता आहे.

काँग्रेस व जनता दल सेक्यूलरमधील काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. पण बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपाला अपयश आल्याचे समजते. शपथविधीसाठी विधानसभेत आलेले काँग्रेसचे काही आमदार भोजनानंतर विधिमंडळातून बाहेर पडणार होते. ते आमदार बहुमत चाचणीदरम्यान गैरहजर राहतील, अशी योजना होती. पण भाजपाचा हा डाव फसल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येडियुरप्पा बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देणार, अशी चर्चा आहे.