करोना संकट काळात कर्नाटकमध्ये सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. भारतीय जनता पार्टील महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.  ज्या दहा स्थानिक महानगर पालिकांच्या निवडणुकी झाल्या होत्या, त्यामध्ये सात ठिकाणी काँग्रेस विजयी झाली आहे. तर भाजपाच्या वाट्याल केवळ एक जागा आली आहे. महानगरपालिका निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

शिवकुमार यांनी या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”१० महानगरपालिकांध्ये निवडणूक पार पडली, यामध्ये सात ठिकाणी काँग्रेसने ताबा मिळवला आहे. भाजपाला केवळ एकच जागा मिळाली आहे. लोकांनी काँग्रेसवर विश्वास दर्शवला आहे. ज्या बद्दल मी धन्यवाद देतो, तर भाजपाला अराजकतेबद्दल शिक्षा मिळाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला एकूण ११९ जागा मिळाल्या आहेत, भाजपाला ५६ आणि जेडीएसला ६७ जागा मिळाल्या आहेत.”

तसेच, शिवकुमार यांनी कर्नाटकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना व नेत्यांना जल्लोष साजरा न करण्याचे आणि करनोा महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकांची मदत करण्याचा आग्रह केला आहे.

विधानसभेत विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या विजयाबद्दल लोकांचे आभार व्यक्त केले आहेत. या निवडणुकांच्या निकालावरून हे स्पष्ट होते की, सत्ताधारी भाजपाने करोना सारख्या संकट काळात जनादेश गमावला आहे. भाजपा सरकार लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे. यामुळे जनतेने भाजपाला धडा शिकवला आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.